पुणे : Kidnapped Kids For Extortion : पिंपरी चिंचवड शहरातील एका जावयानं आपल्या सासूकडून पैसे उकळण्यासाठी चक्क स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलींच्या अपहरणाचा बनाव रचल्यानं खळबळ उडाली. या भामट्या जावयानं चोरीच्या मोबाईलवरुन अपहरणकर्ता बनून 10 लाखांची खंडणी मागितली. मात्र, वाकड पोलिसांनी जावयाची भामटेगिरी उघडकीस आणत मुलींची सुखरुप सुटका केली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी भामटेगिरी करणाऱ्या सचिन मोहिते या जावयाच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी सारिका कैलास ढसाळ (वय 38, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. (Pune Crime News) (Pimpri Chinchwad Crime News) (Pune Extortion Kidnapping Case)
दोन मुलींच्या अपहरणाचा रचला बनाव : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास उपनिरीक्षक रोहित दिवटे आणि त्यांचं पथक गस्त घालत होते. रहाटणीतील कोकणे चौकात काहीजण घाईगडबडीत जात असल्याचं दिसल्यानं पोलिसांनी त्यांना हटकलं. यावेळी सारिका ढसाळ यांनी 'त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि त्यांची बहीण शितल सचिन मोहीते (रा. वाघोली) यांची 15 वर्षाची मुलगीही बेपत्ता आहे. मंगळवारी सायंकाळी दोघीजणी राखी खरेदी करण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याचं त्यांनी पोलीस पथकाला सांगितलं.
पोलीस तक्रार करताना भामटा जावई हजर : सारिका ढसाळ यांनी दोन मुलींचं अपहरण झाल्याची तक्रार दिल्यानं या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत वाकड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकं तयार करून मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असता, त्यावेळी जावाई सचिन मोहिते देखील हजर होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण वाघोली येथून आलो असल्याचं सचिन यानं आपल्या जबाबात सांगितलं. पोलिसांनी शेजाऱ्यांकडं चौकशी केली असता, घटना घडताना सचिन हा कार सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेल्याचं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सचिनच्या कारप्रमाणं दिसणाऱ्या कारमध्ये बसून दोन्ही मुली गेल्याचं दिसलं. त्यामुळे सचिन याच्यावर पोलिसांना संशय बळावला.
चोरीला गेलेल्या मोबाईलवरुन मागितली खंडणी : बुधवारी सकाळी पुन्हा पोलीस तक्रारदारांच्या घरी गेले असता, सचिन याच्या पत्नीनं पोलिसांना 'बहीण सारिका यांचा तीन महिन्यांपूर्वी मोबाईल हरवला होता. त्या नंबरवरून अपहरणकर्त्यांचा फोन आला होता. ‘तुमच्या मुली सुखरूप पाहिजे असतील तर पोलिसांना काही न सांगता 10 लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलींचं बरेवाईट करेन’ अशी धमकी दिल्याचं सांगितलं. त्या फोनवर सचिन मोहिते याचं बोलणं झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सचिन मोहिते याचा या प्रकरणात सहभाग असल्याचं निष्पन्न केलं. त्यानुसार पोलिसांनी सचिनकडं कसून चौकशी केली असता, त्यानं हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. सासू पुष्पा अल्हाट यांना भीती दाखवून त्यांच्या बँकेत असणाऱ्या मालमत्तेपैकी दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.
वाघोलीत ठेवल्या मुली : दोन्ही मुलींना वाघोलीत सुरक्षित ठिकाणी ठेवलं असून त्या सकाळी दहा वाजता वाघोली येथून निघून मनपा पुणे येथे येणार आहेत, असं सचिन मोहितेनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी मनपा पुणे येथे तीन पथकं पाठवली. मात्र, प्रवासाला लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ झाला, तरीही मुली मनपा पुणे येथे पोहोचल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढू लागली. सचिननं मुलींना ठेवलेल्या जागी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता, तिथंही मुली मिळून आल्या नाहीत. त्यानंतर पोलिसांनी पीएमपीएमएल प्रशासनाशी समन्वय साधत, वाघोली ते पुणे मनपा यादरम्यानच्या बसचालक व वाहकांना संपर्क करत मुलींची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलींना बसमधून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी सचिन मोहिते याला अटक केल्याची माहिती उपनिरीक्षक रोहित दिवटे यांनी दिली आहे.
हेही वाचा :