राजगुरूनगर (पुणे)- चांदूस गावात अनधिकृतपणे हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर खेड पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत अनधिकृत दारू निर्मितीसाठी लागणारे लाखो रुपये किमतीचे रसायन व साधनसामुग्री नष्ट केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना खबऱ्याकडून चांदूस गावात हातभट्टी दारू काढली जात आहे. तसेच त्यादारूसाठी लागणारे रसायन एका शेतकऱ्याच्या शेतात तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या पथकाने दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला, यावेळी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे लाखो रुपयांचे कच्चे रसायन व साधन सामग्रीची तोडफोड करून विल्हेवाट लावण्यात आली.
दोघांना अटक-
या प्रकरणी खेड पोलिसांनी हातभट्टीची दारू तयार करणारे सुरेश जयसिंग राठोड, राजू नवलसिंग राठोड ( दोघेही राहणार चाकण ता खेड) याना रंगेहात पकडून अटक केली आहे. त्यांच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सतिष गुरव यांच्यासह पोलीस हवालदार नवनाथ थिटे,अमोल चासकर, संदीप भापकर गुन्हे शोध पथकाचे स्वप्नील गाढवे, सचिन जतकर ,शेखर भोईर, विशाल कोठावळे, निखिल गिरी गोसावी असे कर्मचारी सहभागी होते.