पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या कसबा पोटनवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने यांनी तर, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना हिंदू महासभेकडून आमदार मुक्ता टिळक यांचे पोस्टर त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच जय पुण्येश्र्वरची पोस्टरबाजी करण्यात आली.
विकासाच्या मुद्यावर निवडणूक : कसबा मतदार संघाची पोटनिवडणुकीची जेव्हापासून चर्चा सुरू झाली तेव्हा पासूनच आम्ही ठवरले होते की ही निवडणूक लढवायची आहे. कसबा पोट-निवडणूक हिंदू महासभा लढवणार हे त्याचवेळी निश्चित करण्यात आले होते. तसेच जेव्हा सर्व पक्षाचे उमेदवार जाहीर झाले तेव्हा ही कसबा पोट निवडणूक लढवायची तयारी आम्ही केली होती. तसेच कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अशी प्रतिक्रिया दवे यांनी अर्ज भरल्यानंतर दिली आहे. आर्थिक आरक्षणाचा मुद्दा, पुनेश्वर मुक्तीचा मुद्दा, तसेच कसब्याचा विकास या मुद्द्यावर आम्ही ही पोटनिवडणूक लढवणार आहे असे, यावेळी हिंदू महासभेचे उमेदवार आनंद दवे यांनी म्हटले आहे. भाजपने उमेदवार दिला असला तरी ते ही निवडणूक लढवणार आहेत.
ब्राह्मण समाज नाराज : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोट-निवडणुकीत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक किंवा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर कसबा मतदारसंघातील ब्राह्मण समाज नाराज झाला आहे. त्यानंतर आज हिंदू महासभेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
हिंदू महासभा मैदानात : आजाराशी झुंज देताना देखील आमदार मुक्ता टिळक यांनी आपल्या पक्षासाठी योगदान दिले. मात्र, पक्षाकडून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देता दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे. ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला डावलून भाजपकडून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आज आम्ही हिंदू महासभेकडून निवडणूक लढवणार असल्याच यावेळी सांगण्यात आले आहे.