पुणे - सह्याद्रीच्या कुशीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे, आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातून आरळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा - #PuneRain : लोणावळ्यात ढगफुटी! घरे-बंगले जलमय, 24 तासात 400 मिमी पाऊस
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भीमाशंकर परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे, १.५ टी.एम.सी क्षमता असणारे कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आरळा नदीतून चास-कमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुरूवारी पहाटे २ वाजता १०० टक्के भरले
खेडसह आंबेगाव तालुक्यातील आरळा नदीवर असणारे १.५४ टि.एम.सी क्षमतेचे कळमोडी धरण गुरूवारी पहाटे २ वाजता १०० टक्के भरले. काळमोडी धरणातील आठही सांडव्यांद्वारे काल रात्री ६ हजार ९७९ क्यूसेक वेगाने पाणी स्वयंचलित दरवाजाद्वारे आरळा नदीत सोडण्यात आले. पहाटे पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने ३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
२४ तासांत ९४ मि.मी पावसाची नोंद
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर खोऱ्यात विशेषत: कळमोडी धरण परिसरात पडत असणाऱ्या पावसाची मागील २४ तासांत ९४ मि.मी नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच असून बुधवारी सकाळी कळमोडी धरणात ८० टक्के असणाऱ्या साठ्यात एक दिवसांत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली. कळमोडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून यामुळे आरळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. पाण्याचा वेग कमी जास्त होत असून आरळा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम भागांत मागील रविवारपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची संतधार सुरू असून पावसाने धामणगाव, घोटवडीसह परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे कळमोडी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. यामुळे खेड सह शिरूर तालुक्याला वरदान ठरणारे चासकमान धरण भरण्यास मदत होणार आहे. चासकमान धरण परिसरात मागील २४ तासांत ६८ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच, भिमाशंकर परिसरात ३१३ मि.मी पाऊस झाला आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पडत असणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत 3.08 मी. वाढ झाली आहे. पाणीसाठ्यात 1 टी.एम.सी.वाढ झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस अद्यापही सुरू आहे.
हेही वाचा - दरड कोसळल्याने श्री क्षेत्र भीमाशंकरला जाणारा मार्ग बंद