पुणे : शनिवारी पुण्यात धर्मजागरण सभेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कालीचरण महाराज हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आधी त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिव समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक दीपक नागपुरे, अली दारुवाला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाबाबत म्हणताना कालीचरण महाराज म्हणाले की, या सभेचा उद्देश जात, भाषा, प्रांत अशा वादांमध्ये अडकलेल्या हिंदू धर्मातील लोकांना एकत्र आणणे आहे. कट्टर हिंदू व्होट बँक बनविणे, पण आज देशात हिंदू व्होटर बँक बनविण्यात सर्वाधिक समस्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये असलेल जातीवाद आहे.
हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न : आज हिंदूंमध्ये जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद हे प्रामुख्याने भारतात पाहायला मिळत आहे. जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मध्वजाखाली एकत्र येऊ देत नाही. आज आम्ही अश्या सभा ठिकठिकाणी घेऊन या सर्वातून हिंदूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे, असेही यावेळी कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. यावेळी मंदिरांच्या बाबतीत म्हणताना कालीचरण महाराज म्हणाले की, ताजमहालची आतील बाजू पाहायला देत नाही. तयखाना का बंद केले आहे? आज आपण पाहिले तर कुतुबमिनार हे 27 हिंदू जैन मंदिरांना तोडून बनविण्यात आले आहे. याचे प्रमाण देखील आर्कोलोजी येथे आहे. 5 लाख हिंदू मंदिरे तोडून वेगवेगळ्या ठिकाणी स्मारक बनविण्यात आले आहे. आत्ता जर या देशाचा राजा हे तोडून हिंदू मंदिर जर बनवत असेल, तर त्यात वाईट काय आहे? असे देखील यावेळी महाराज म्हणाले.
हिंदूंनी संघटीत होणे गरजेचे : सध्या देशात घडत असलेल्या लव्ह जिहादबाबत कालीचरण महाराज यांना विचारले असता ते म्हणाले की, हिंदू मुलींनी इतर धर्मीयांशी केलेल्या विवाहाचे परिणाम आपण बघतोच आहोत. लव्ह जिहादच्या आज देशात मोठ्या प्रमाणात घटना घडत आहे.अनेक हिंदू मुलींचे जीव यात गेले आहे.आज हिंदू मुली या सुरक्षित असल्या पाहिजे. या लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी देशभरातील हिंदूंनी संघटीत होणे गरजेचे आहे. मुस्लिम समाज आज देशात संख्येने खूपच कमी आहे, म्हणून आपल्याला त्यांच्यात भाईचारा पाहायला दिसत असतो. मात्र त्यांची संख्या वाढल्यावर ते याच भाईला आपला चारा बनवतात, असे वादग्रस्त वक्तव्य यावेळी कालीचरण महाराज यांनी केले.
हिंसेचे उघड समर्थन : दोन मुलांच्या मुद्द्यांवरून त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी काही लग्न केलेले नाही. मी एक संन्यासी आहे. याबाबत मी काहीही बोलू शकत नाही, असे देखील यावेळी महाराज म्हणाले. तसेच मॉब लिंचिगबाबत कालीचारण महाराज यांना विचारले असता ते म्हणाले की, आज देशात काही ठिकाणी विशिष्ट समुदायातल्या युवकांवर जमावाने हिंसेच्या घटना घडत आहेत. अशा घटनांबद्दल मनात कोणतीही खंत नाही. त्यामुळे अशा हिंसेचे मी उघड समर्थन करतो, अशा शब्दांत कालीचरण महाराज यांनी मॉब लिंचिगला पाठिंबा दिला.