जुन्नर (पुणे) : शेत जमीनीच्या वादातून चुलत भावाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत, त्याचा खून केल्याचा प्रकार जुन्ररमध्ये समोर आला आहे. तालुक्यातील आनंदवाडीमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. महेश धनराज भुजबळ (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमोल बाळकृष्ण भुजबळ (वय २६) याच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धनराज चिमाजी भुजबळ (वय ६०) यांच्या हिस्स्याची वडिलोपार्जित जमीन ही त्यांचा भाऊ बाळकृष्ण चिमाजी भुजबळ वापरतात. याच जमीनीचा वाद अनेक दिवसांपासून सुरु होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अमोल आणि धनराज या काका-पुतण्यामध्ये बाचाबाची झाली. मी बघून घेतो, असे सांगून अमोल तेथून रागाने निघून गेला. काही वेळातच परत येत, त्याने धनराज भुजबळ यांचा मुलगा महेश याच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. यामध्ये जखमी झालेल्या महेशला उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद धनराज भुजबळ यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली.
महेश हा धनराज भुजबळ यांचा एकुलता एक मुलगा होता. तो कुरण येथील जयहिंद महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. एक वर्षापूर्वी जुन्नर रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात तो सुदैवाने वाचला होता. मात्र, या घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा : प्रेमप्रकरणातून २० वर्षीय तरुणाचा खून, सहा जण ताब्यात