पुणे - राजगुरुनगर परिसरातील एका कोरोना संशयित महिलेला जहांगीर रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र, या महिलेत कोरोनाची लक्षणे कमी असल्याचे कारण देत पाच दिवसांतच तिला डिस्चार्ज दिल्याचा प्रकार समोर आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जहांगीर रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जहांगीर रुग्णालय प्रशासनाने तातडीने या कोरोनाबाधित महिलेला पुन्हा रुग्णालयात भरती केले.
जहांगीर रुग्णालयात काम करणाऱ्या राक्षेवाडी येथील व्यक्तीला सात दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आल्याने त्याची पत्नी आणि कुटुंबातील इतर तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून समोर आले. दरम्यान मुख्य रुग्णाच्या पत्नीला जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाच दिवसांतच या कोरोनाबाधित महिलेला डिस्चार्ज देऊन घरात क्वारंटाईन केले. त्यानंतर राक्षेवाडी गावचे पोलीस पाटील पप्पु राक्षे यांनी पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे यांना या प्रकरणाची माहिती दिली. राक्षे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाला घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. प्रशासनाकडून तातडीने जहांगीर रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले.
पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच खासगी रुग्णालयांकडून बेजबाबदारपणा होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सभापती अंकुश राक्षे यांनी केली आहे.