पुणे - कोरेगाव-भीमा लढतीच्या बाबतीत अनेकांच्या माध्यमातून विविध इतिहास सांगितले गेले आहेत. जसं सांगितलं जातं की, कोरेगाव भीमाची लढाई ही पेशव्यांच्या विरोधात होती तर तसं काहीही नसून 1 जानेवारी 1818 रोजी कोरोगाव भीमा येथे झालेली लढाई ही फक्त एक चकमक होती. तेव्हा ब्रिटिशांनी फक्त डिफेन्स केला आणि तसा उल्लेखही स्तंभावर आहे, असं मत 1 जानेवारी 1818 कोरोगाव भीमा लढाईचे वास्तव हे पुस्तक (Reality of the Koregaon Bhima battle) लिहिलेल्या अॅड. रोहन जमादार माळवदकर यांनी व्यक्त केले आहे.
कोरेगाव भीमा लढाईत इंग्रजांकडील सैनिक व जयस्तंभाचे इंचार्ज जमादार खंडोजी माळवदकर यांचे वंशज अडव्होकेट रोहन जमादार माळवदकर यांनी 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव हे पुस्तक लिहिले असून याचे प्रकाशन आज करण्यात आले. आता या पुस्तकावरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पण समकालीन संदर्भ आणि पुराव्यांसह कोरेगाव भीमा लढाईची सत्य माहिती देणारे हे पुस्तक असल्याचे माळवदकर यांनी सांगितले आहे.
तिसरे इंग्रज-मराठा युद्ध व कोरेगाव भीमाच्या या अनिर्णायक लढाईचे तत्कालीन अस्सल संदर्भ, कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास केल्यास ही जातीअंताची लढाई नव्हती हे समजते. स्वतः भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही कोरेगावच्या युद्धास जातीअंताची लढाई कधीच म्हटलेले नाही. याउलट जातीवादी कारणांमुळे महार बांधवाना इंग्रजांनी आपल्या सैन्यात प्रवेश बंदी केली म्हणून कोरेगावच्या लढाईच्या स्मरणार्थ इंग्रजांनी जयस्तंभ उभारला. तिथेच सभा घेऊन १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन पुकारले. तरीही जातीअंताच्या नावाखाली समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीने कोरेगावच्या लढाईचा खोटा इतिहास मांडला जात आहे.
या लढाईत शौर्य गाजवणारे खंडोजीबीन गजोजी माळवदकर यांना इंग्रजांनी जयस्तंभाचे इन-चार्ज नेमले. त्यांचा वंशज या नात्याने खरा इतिहास समोर यावा, सामाजिक सलोखा कायम राहावा या उद्देशाने संदर्भ पुराव्यांच्या आधारे दोन शतकांपूर्वी झालेल्या कोरेगाव भीमाच्या लढाईचे वास्तव सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तिकेच्या माध्यमातून केला आहे, असं यावेळी रोहन माळवदकर यांनी सांगितले आहे.