पिंपरी-चिंचवड (पुणे) - माझा इतिहास आहे की, कोणत्याही दबावात येत नाही. माझे काम निःपक्षपाती आहे. त्यामुळे जे योग्य असतील तेच निर्णय घेण्यात येतील. तसेच शहरातील गुन्हेगारीचा बिमोड कोणाच्याही दबावात न येता करणार असल्याचा विश्वास, पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.
ते आयुक्तालयात आयोजत पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलीस आयुक्तालयाचे मावळते पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची मुदतपूर्व बदली झाल्यानंतर आज (शनिवार) नवनियुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला आहे. 2 ऑगस्टला गृह विभागाने बदल्यांचे आदेश काढले होते. गेल्या काही दिवसांपासून बिष्णोई यांची बदली होणार अशी चर्चा होती अखेर त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, आज (दि. 5 सप्टें) त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परखड मत व्यक्त केले.
20 सप्टेंबर 2019 ला आयुक्त संदीप बिष्णोई यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 21 सप्टेंबर रोजी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाचा पदभार स्वीकारला होता. अवघ्या 11 महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्यांना यश आल्याचे निदर्शनास आले नाही. अनेक अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल उघड नाराजी होती. दरम्यान, गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या एका आमदाराने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोलीस आयुक्तांविषयी नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये बहिणीचा विनयभंग केल्याने पोलीस मुलाची अपहरण करून निर्घृण हत्या