पुणे - मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद चंद्र दर्शन झाल्याने बुधवारी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये मुस्लीम बांधवांची खाद्यपदार्थ आणि कपडे खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. पुण्यातील कॅम्प, कोंढवा, आणि मोमिनपुरा परिसरामध्ये मुस्लीम बांधवांनी विविध प्रकारचे पोशाख, शीरखुर्माच्या शेवया, खजूर, फळे, आदी वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.
त्याप्रमाणेच विविध सामाजिक संस्थांनी सामाजिक सलोखा जपण्यासाठी ईद निमित्त सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये देशी-विदेशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, ईदच्या चंद्राचे दर्शन झाल्याने उद्या सकाळी पुण्याच्या विविध भागांमध्ये ईद निमित्त मुस्लीम बांधव नमाज अदा करणार आहेत. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात येणार आहे.
चंद्र दर्शनाने ६ मे पासून रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली होती. या पवित्र महिन्यात दररोज रोजे आणि कुराण पठण करण्यात येत होते. तसेच दिवसभर कडक उपवास केल्यानंतर संध्याकाळी इफ्तार केला जात असे. महिनाभराच्या कडक उपासनेनंतर उद्या साजऱ्या होणाऱ्या ईद निमित्त देशभरात उत्साह दिसत आहे.