पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी 1ऑगस्टला पुण्याच्या दौऱ्यात विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. परंतु त्यांच्या या दौऱ्यात विरोधी पक्ष आक्रमक होणार आहेत. सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येत पंतप्रधानांविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात येणार असल्याचा ठराव विरोधी पक्षांच्या बैठकीत करण्यात येणार आहे.
आंदोलन का करणार विरोधक: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन पंतप्रधानांना विरोध करण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. नुकतीच तयार झालेली विरोधकांची इंडिया या पक्षातील सर्व पक्षाचे नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 1 ऑगस्टला पंतप्रधानाविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी गो बॅक मणिपूर आणि फेस द पार्लमेंट, अशी या आंदोलनाची टॅगलाईन सुद्धा तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. त्याला जबाबदार असणारे, केंद्र सरकार आणि नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये गेले पाहिजे. त्या ठिकाणची स्थिती पाहून काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु पंतप्रधान आपला सन्मान घ्यायला आणि विकासकामांचे उद्घाटन करायला पुण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना याची जाणीव करुन देण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. -प्रशांत जगताप
मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा : देशामध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मणिपूरच्या चर्चेवरुन या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ होत आहे. मणिपूर हिंसाचाराच्या या सगळ्या परिस्थितीवर विरोधक आक्रमक झाले असतानाच पंतप्रधान पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी येत आहेत. यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. हा दौरा महत्त्वाचा असण्याचे कारण म्हणजे पुरस्कार समारंभाच्या या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
शरद पवार गटाचे कार्यकर्ते करणार आंदोलन- राष्ट्रवादीतील बंडानंतर हे दोन नेते प्रथमच एकत्र येणार आहेत. शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहेत. शरद पवारांचा गटदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात गो बॅक मणिपूर फेस द पार्लमेंट, अशा घोषणा देऊन आंदोलन करणार आहे. त्यामुळे एकीकडे राष्ट्रीय अध्यक्ष पंतप्रधानांसोबत एकाच व्यासपीठावर असताना त्यांच्याच पक्षाकडून अशा आंदोलनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा-