पुणे : कसबा पोटनिवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपकडून हेमंत रासने यांच्यात लढत होणार आहे. कसबा पोट निवडणुकीसाठी विविध पक्ष संघटनाकडून एकूण 16 उमेदवार रिंगणात आहे. कसबा पोटनिवडणूकीत मतांची विभाजन होऊ नये म्हणून अपक्ष उमेदवार खिसाल जाफरी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रचारातील सभेत पाठिंबा जाहीर : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत आज अपक्ष उमेदवार खिसाल जाफरी यांनी जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.
या कारणासाठी दिला पाठिंबा : खिसाल जाफरी यांनी सांगितले की, मी गेल्या 15 वर्षापासून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. राजकारणात काम करत असताना प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असते. मला देखील अपेक्षा होती की, पक्षाकडून काही ना काही जबाबदारी देण्यात येईल, पण तसे विचार न केल्याने मी कसबा पोटनिवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी भरली होती. पण आज जेव्हा कसबा मतदारसंघाचा विचार केला तर आहे मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार असून मतांची विभाजन होऊ नये, म्हणून मी आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे यावेळी जाफरी यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडची माघार : राजकारणामध्ये विचार वादविवाद हे होत असतात परंतु शेवटी संभाजी ब्रिगेडचे मावळे हे आदेश मानणारे असतात. मावळ्याने आदेश मानायचा असतो. त्याप्रमाणे काल उद्धव ठाकरे,अजित पवार यांच्या मध्यस्थीने काही चर्चा झाली. त्या चर्चेने आमचे समाधान झाले असून संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला या निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच आम्ही माघार घेतली आहे. यापुढे काँग्रेसने आम्हाला सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : Kasba Bypoll : कसबा मतदारसंघ पोटनिवडणूक; माजी सैनिकांचा उमेदवार रिंगणात