बारामती- इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी पोलीस ठाण्यात आलेल्या वेगवेगळ्या फिर्यादी व तक्रारदारांना योग्य तो न्याय दिला नाही. यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे यांनी पोलीस अधिकारी सारंगकर यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्यावर योग्य त्या कारवाईची मागणी केली होती. या मागणीसंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज इंदापूर शहरात बंद पुकारण्यात आला होता. आपली दुकाने बंद ठेऊन व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले.
कारवाई करण्याचे दिले होते आश्वासन
दरम्यान पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्याविरोधात राहुल मखरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन समोर दि.१९ डिसेंबर रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन चिघळणार त्याच वेळी दि.२० डिसेंबर रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपोषण स्थळास भेट देत अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना फोन केला. यावेळेस मोहिते यांनी भीमा कोरेगावच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने दि.६ जानेवारीपर्यंत सदर प्रकरणी कारवाई करू असे आश्वासन दिले होते. या आश्वासनावरून उपोषण मागे घेण्यात आले.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
आश्वासनानंतर ही पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने, आज इंदापूर शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बंदचे आव्हान करण्यात आले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत इंदापूर शहरातील मुख्य बाजार पेठेसह सर्वच दुकाने बंद ठेवत व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले. या बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. दरम्यान यानंतर देखील सारंगकर यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा मखरे यांच्यावतीने देण्यात आला आहे.