पुणे - हणमंत गायकवाड यांच्या 'बिव्हीजी' कंपनीच्या पिंपरी चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. मात्र, यावेळी पत्रकारांना आत येण्यास मज्जाव करण्यात आला. अद्यापही छापा टाकल्याचे कारण अस्पष्ट आहे. आज बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिव्हीजीवर अचानक छापा टाकला. बीव्हीजीच्या पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयावर देखील छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
'हाऊस किपींग' आणि आरोग्य क्षेत्रातील नामांकीत कंपनी म्हणून बीव्हीजीचा नावलौकिक आहे. राष्ट्रपती भवनासह देशभरातील अनेक शासकीय कार्यालयात तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्या व संस्थांमध्ये बीव्हीजी स्वच्छता सेवा पुरवत आहे. आज सकाळी पिंपरी-चिंचवड येथील बिव्हीजीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या सुमारे ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर न सोडता सर्वांचे मोबाईल फोन काढून घेतले. तसेच कार्यालयातील इतर संपर्क देखील बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोठे होताना हितशत्रू वाढतात - हणमंत गायकवाड
आमचा व्यवसाय पारदर्शक आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाचा छापा नव्हे, चौकशी सुरू आहे. त्याला आम्ही सहकार्य करत आहोत. संबंधित कार्यालयाच्या चाव्या आणि संगणकांचे पासवर्ड दिलेले आहेत. जे आहे ते उघड आहे. मोठे होत असताना अनेक जणांना ते खुपत असते. त्यामुळेच हितशत्रू वाढतात, असे कंपनीचे संस्थापक हणमंत गायकवाड म्हणाले.