पुणे - भारतीय नौदलाच्या वतीने लोणावळा येथील आयएनएस शिवाजी महाविद्यालयात आण्विक, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण केंद्राचे (अभेद्य) उद्घाटन करण्यात आले. अॅडमिरल सुनिल लांबांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला.
भारतीय नौदलाचे हे प्रशिक्षण केंद्र आशिया खंडातील सर्वात मोठे आणि अशा प्रकारचे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्राद्वारे सागरी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग प्रभावीपणे करण्याचा भारतीय संरक्षण मंत्रालयाचा प्रयत्न आहे. दरम्यान आण्विक, जैविक आणि रासायनिक प्रशिक्षण केंद्राच्या (अभेद्य) स्थापनेमुळे भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकारी आणि जवानांना अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या संभाव्य आण्विक, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांची पूर्वकल्पना मिळणे आणि अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे आता शक्य होणार आहे.