पुणे - शिवाजीनगर न्यायालयातून १ ऑक्टोबर रोजी अपहरण झालेले अॅड. उमेश मोरे यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी खून करून मृतदेह ताम्हिणी घाटात टाकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जमिनीच्या वादातून हा खून झाला. आरोपींनी १ ऑक्टोबर रोजी उमेश मोरे यांचे शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण केले. त्यानंतर ताम्हिणी घाटात नेऊन खून करून मृतदेह घाटात टाकून दिला. सखोल तपास करीत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला. शिवाजीनगर पोलिसांनी उमेश मोरे यांचा शोध घेण्यासाठी न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. यावेळी उमेश मोरे हे बेपत्ता झाल्याच्या दिवशी त्यांच्या आसपास संशयास्पदरित्या दोन व्यक्ती दिसल्या होत्या. आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक स्वतंत्र पथक तयार करून प्रकरणातील तांत्रिक बाजूही तपासली होती.
मोठ्या लाच प्रकरणाच्या गुन्ह्यातील फिर्यादी
उमेश मोरे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. दोन वर्षांपूर्वीच्या एका मोठ्या लाच प्रकरणाच्या गुन्ह्यातील ते फिर्यादी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भूमिअभिलेख अभियंता बाळासाहेब वानखेडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. १ ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात गेले होते. न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी काही मित्रांनाही ते भेटले. त्यानंतर पत्नीशी फोनवर बोलल्यानंतर घरी येतो, असे त्यांनी सांगितले. परंतु, रात्री नऊ वाजल्यानंतरही ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.
हेही वाचा- उरुळी कांचनमध्ये ढगफुटी, बाजारपेठ आणि घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत