पुणे - सध्या शहरात विना हेल्मेट दुचाकी चालकांवर पोलीस कारवाई करत आहेत. मात्र, अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांचे प्रबोधन करण्यावर पोलिसांनी भर दिला पाहिजे. तसेच हेल्मेटसक्तीची गरज हायवेवर पाहिजे, असे स्पष्ट मत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. याविषयी आपण स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुण्यात बोलत होते.
मद्यप्राशन करून दुचाकी चालविणे, भरधाव वेगाने गाडी चालविणे, ट्रिपलसीट गाडी चालविणे अशाप्रकारच्या घटना शहरात सातत्याने होत असतात. वाहतूक पोलिसांनी अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची गरज असल्याचेही बापट म्हणाले.
पुणे शहरात 1 जानेवारी पासून हेल्मेटसक्ती करण्यात आली. मागील पाच महिण्यात पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमभंगापोटी तब्बल 48 कोटींचा दंड वसूल केला. यातील 20 कोटींचा दंड फक्त हेल्मेट न वापरल्यामुळे वसूल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या निर्णायाचा दाखला देत पुणे पोलिसांकडून शहरात हेल्मेटसक्ती प्रभावीपणे करण्यात येत आहे. पोलिसांच्या या निर्णयाचा पुणेकरांनी कडाडून विरोध केला. हेल्मेटकृती विरोधी समितीने तर या निर्णयाविरोधात पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. परंतू तरीही पोलिसांनी माघार न घेता हेल्मेटसक्ती सुरुच ठेवली.