पुणे - शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे. विविध क्षेत्रातील कोरोना योद्धे आपापल्या परीने समाजाच्या स्वास्थ्यासाठी हातभार लावत आहेत. स्मशानातील चिता चोवीस तास धगधगताना दिसतात. गेल्या वर्षभरापासून हजारो कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम स्मशानभूमीतील कर्मचारी करत आहेत. न थकता ते आपले काम नेटाने करतात. मात्र, त्यांच्या समस्यांकडे आणि अपेक्षाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
आतापर्यंत हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार -
पुणे शहरात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची एन्ट्री झाली आणि वेगाने संपूर्ण शहर हॉटस्पॉट झाले होते. याकाळात डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत होते. मधला काही काळ कोरोनाचा संसर्ग कमी झाला. मात्र, या कोरोना योद्ध्यांचे काम थांबले नव्हते. आता पुन्हा दुसरी लाट आली आहे. रूग्णांची आणि मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत स्मशानभूमीतील कोरोना योद्ध्यांचे काम वाढले आहे. दिवसाला दोन अंकीसंख्येतील मृतदेहांवर स्मशानभूमीतील कर्मचारी अंत्यसंस्कार करत आहेत.
स्मशानातील कोरोना योद्ध्यांचे अनुभव -
कोरोना रुग्णाच्या जवळ जाण्यासाठी लोक घाबरतात. त्यामुळे स्मशानभूमीतील कर्मचारीच कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. मृत रूग्णांचे नातेवाईक लांब उभे राहातात. मात्र, हे कोरोना योद्धे जीवाची बाजी लाऊन आपले काम इमाने इतबारे करतात. स्मशानभूमीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियामध्ये भीती कायम आहे. आम्ही नाही केल तर हे काम कोण करणार? आम्ही शक्य ती काळजी घेतो, असे हे कर्मचारी सांगतात. कोरोनाच्या काळात अनेक चांगले-वाईट अनुभव या कर्मचाऱ्यांना आले आहेत. कधी-कधी एकही नातेवाईक अंत्यसंस्कराला आलेला नसतो. केवळ व्हिडिओ कॉलकरून अंत्यसंस्कार बघितले जातात.
कामाप्रमाणे मोबदला मिळत नाही -
कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम अत्यंत जोखमीचे आहे. मात्र, तसा मोबदला मिळत नसल्याची भावना या कर्मचाऱ्यांची व्यक्त केली. प्रशासनाने मानधन वाढवून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.