पुणे - आळंदी आणि देहूतून निघणाऱ्या पंढरीच्या वारीला काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, यंदा पालखी सोहळ्यावर महामारीचे सावट आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पालखी सोहळ्यावर पाणी फेरू शकतो. यामुळे पालखी सोहळ्यात उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, आळंदी देवस्थान, देहू देवस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संस्थान कमिटीने पालखी सोहळा कशा प्रकारे साजरा करता येईल, यासंबंधी तीन पर्याय सुचवले आहेत.
- चारशे वारकऱ्यांना घेऊन पालखी सोहळा पूर्ण करणे हा एक पहिला पर्याय आहे. यामध्ये दिंडीतील विणेकऱ्यांना घेऊन वारी पूर्ण करणे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात साधारण 425 दिंड्या असतात. यातील कायमस्वरूपी असणाऱ्या 278 दिंंड्यांतील विणेकऱ्यांना घेऊन पालखी सोहळा पार पडू शकतो.
- 100 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडेल. यामध्ये 50 वारकरी आणि इतर व्यवस्थापन करणारे तसेच अन्य 50 जण असतील
असतील. - कमीतकमी वारकऱ्यांना घेऊन माऊलींच्या पादुका वाहनांमधून पांडुरंगाच्या भेटीला नेऊन हा सोहळा पूर्ण करणे
प्रशासनाने देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे. येणाऱ्या काळातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून यावर निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या 29 मे रोजी पुन्हा एक बैठक होणार असून यावर विचार होणार आहे. तसेच या बैठकीनंतरच अंतिम निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.