पुणे - औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षेमुळे वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षात बेबनाव झाला. एमआयएम पक्षाने वंचित आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका ही इम्तियाज जलील यांची वैयक्तिक आहे. ही पक्षाची भूमिका नाही, असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात मतभेद नाहीत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यांनी सांगितले.
हेही वाचा - डॉ. कोल्हेंनी किल्ल्यातल्या बाभळी आधी काढाव्या -पर्यटनमंत्री रावळ
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत वाद निर्माण झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या आघाडीतून एमआयएम बाहेर पडणार, असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, इम्तियाज जलील यांच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षेमुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात एमआयएम पक्षाला तब्बल शंभर जागांची मागणी केली.
हेही वाचा - ...अन्यथा चिपको आंदोलन करू; पर्यावरणप्रेमींचा सरकारला इशारा
एमआयएम पक्षाचे नेते ओवेसी यांनी सतरा जागांची यादी प्रकाश आंबेडकर यांना पूर्वीच दिली आहे. त्यामुळे इम्तियाज जलील आणि एमआयएमचे ओवेसी यांच्यात कुठेतरी बिनसले असल्याचे वंचित आघाडीचे म्हणणे आहे. एमआयएमचे नेते ओवेसी हे कुठली भूमिका जाहीर करत नाहीत, तोपर्यंत एमआयएम बहुजन वंचित आघाडीत आहे, असे आम्ही मानत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे. या संदर्भात चित्र लवकरच स्पष्ट होईल, असे वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आले आहे.