पुणे- दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ येथे दुधाच्या कॅनमध्ये ताडी वाहतूक करणाऱ्या वाहनावर पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ही करावाई करण्यात आली. प्रकाश भंडारी (रा. राणगाव, ता. इंदापूर जि. पुणे) असे ताडी वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या बोलेरो वाहनामध्ये ५ दुधाच्या कॅन आढळून आल्या. यात दुधा ऐवजी ताडी होती. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाचे महिंद्रा बोलेरो वाहन, किंमत अंदाजे ५ लाख रुपये, तसेच ताडी असलेले दुधाचे ५ कॅन किंमत अंदाजे १४ हजार ५०० रुपये, असा एकूण ५ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी व मुद्देमाल दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकार राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननावरे, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, अनिल काळे, रविराज कोकरे आदींनी केली.
हेही वाचा- पुण्यात महिलेचा विनयभंग करून दोन्ही डोळे केले निकामी...हल्लेखोर फरार