पुणे - बंदी घालण्यात आलेल्या विदेशी कंपन्यांच्या सिगारेट्सचा ९ लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. पुण्यातील कॅम्प परिसरातील लाल देऊळ भागात एका सोसायटीत ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
हिदायतुला खुशमुदुल्ला खान (वय 40), उमर फारुख शेख (वय 40) आणि महमंद अफजल युसूफ (वय 20) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.
खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल देऊळ परिसरातील एका सोसायटीत अवैध सिगरेट्सचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून हा सिगारेट्सचा साठा जप्त केला आहे.
या सर्व सिगारेट्स विदेशातून आयात केलेल्या आहेत. तसेच यावर कोणताही वैधानिक इशारा छापण्यात आलेला नाही. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.