पुणे - नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असणाऱया मावळ लोकसभा मतदारसंघातील धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱयांचे प्रश्न गेल्या साठ वर्षांपासून प्रलंबित आहेत. केंद्र सरकारने बंदरांसाठी, औद्योगिकीकरणासाठी पारंपारिक शेती करणाऱया शेतकऱयांच्या, कोळी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. परंतू त्यांना न्याय्य मोबदला दिला नाही. या प्रश्नांवर मी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे मावळ लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी राजाराम पाटील म्हणाले, की मुंबईला देशाची आर्थिक राजधानी व पिंपरी चिंचवडला जागतिक दर्जाची उद्योगनगरी बनविण्यात स्थानिक शेतकऱयांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या जमिनी सरकारने वेळप्रसंगी गोळीबार करुन ताब्यात घेतल्या. वाढत्या औद्योगिकीकरणात पारंपरिक व्यवसाय करणारे शेतकरी, कोळी बांधव, आगरी बांधव बेरोजगार झाले. मागील ६० वर्षात त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला पूर्ण मिळाला नाही.
पर्यावरणाच्या नावाखाली समुद्रातील रेती काढण्यावर बंदी आणली. त्यामुळे आगारी, कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. खाडींमध्ये रेती साचल्यामुळे मासेमारीवर आणि बंदरांवर बोटी आणण्यावर परिणाम होत आहे. उरण - पनवेलला रेती उपसा बंद करुन गुजरातमधून रेती का आणली जाते. तसेच विमानतळ व रस्ते बांधण्यासाठी डोंगर, टेकड्या फोडून पर्यावरणाची हानी होत नाही का? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
राजाराम पाटील व राहुल ओव्हाळ यांनी पिंपरीतील एच.ए. कंपनी प्रवेशव्दारावर कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वंचित बहुजन आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील आणि शिरुर लोकसभेचे उमदेवार राहुल ओव्हाळ सोमवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अशी माहिती देवेंद्र तायडे यांनी दिली.
पिंपरी येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस भारीपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, शिरुर लोकसभेचे उमेदवार राहुल ओव्हाळ, माजी नगरसेवक रामचंद्र माने, अंकुश कानडी तसेच सुरेश गायकवाड, रजनीकांत क्षीरसागर, राहुल इनकर, राजेश बारसागडे, के.डी. वाघमारे, सनी गायकवाड, भिमाबाई तुळवे, रुहीनाज शेख आदी उपस्थित होते.