पुणे - ख्रिश्चन धर्मगुरू असल्याने विरोध करणाऱ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी उत्तर दिले आहे. "मी तलवारी आणि सुयांशी लढत आलेलो आहे. मी अस्सल भारतीय आहे, अस्सल महाराष्ट्रीयन आहे. मला माझी ओळख सिद्ध करण्याची गरज नाही. माझी नाळ मराठीशी जोडली गेलेली आहे", अशा शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारले आहे. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फादर दिब्रिटो यांचा गुरुवारी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
दिब्रिटो म्हणाले, विरोध करणाऱ्यांना वसई सर्व धर्मांची आहे हे माहितीच नाही. आमच्या कार्यक्रमांची सांगता पसायदानाने होते. मी विरोधाला घाबरत नाही. मला माझ्यावरील हल्ल्याची चिंता नाही. मी कुठल्या एका सत्तेविषयी बोलत नाही. पण, व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत. जगात जिथे असे घडते तिथे हुकूमशाही येते. आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे. काही घटक तिला वेगळे करु पाहत आहेत" आम्ही धर्माचे सांगाडे बाहेर काढत राहिलो तर आमची तरूण पिढी आम्हाला माफ करणार नाही. मला सीमेबाहेरच्या शत्रुंपेक्षा घरातील शत्रुंची चिंता वाटते, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - साहित्य संमेलन : 'फादर दिब्रिटोंची निवड रद्द केल्यास ख्रिश्चन समाजाचा मतदानावर बहिष्कार'
याविषयी बोलताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे म्हणाले, मराठी विचारविश्व एखाद्या डबक्यासारखे राहावे, अशी खूप लोकांची इच्छा आहे. त्या डबक्याचे नदीत रूपांतर होत असताना त्यात थोडे अडथळे, दगड-धोंडे येतातच. पण, ही नदी त्या सगळ्यांचा स्वतःसोबत घेऊन पुढे जाणार आहे. फादर यांना विरोध करणे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यांचाबद्दल जे शब्द वापरले जात आहेत ते योग्य नाहीत. फादर एक भूमिका घेणारे उत्तम लेखक आहेत. म्हणून ते संमेलनाचे अध्यक्ष झाले.