(पुणे- पिंपरी चिंचवड) - भोंदूबाबासोबत असलेल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला. ही घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. पोलिसांच्या तपासात खून केल्यानंतर मृतदेह कात्रज घाटात टाकल्याची माहिती समोर आली. दरम्यान, मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आनंद गुलाब गुजर (43, रा. चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, त्याच्या पत्नीचे सरोज आनंद गुजर (40, रा. चिखली), असे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात रमेश विलास कुंभार (49, रा, आकुर्डी, पुणे), यश योगेश निकम (19, रा. वाल्हेकरवाडी, निगडी) आणि रामदास बडदम (रा. वाल्हेकरवाडी, निगडी) यांना अटक केली आहे. याप्रकरणी आनंद याचा भाऊ सुनिल गुलाब गुजर (36) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कात्रज घाटात सापडला मृतदेह
शनिवारी सकाळी कात्रज घाटात आनंद गुजर यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर पोलिसांना आनंद गुजर यांची पत्नी सरोज आणि भोंदूबाबा रमेश विलास कुंभार यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी हा खून केल्याचे सांगितले.
शिव गोरक्षनाथ नावाने मठ
भोंदूबाबा रमेश कुंभार याचा वालेकरवाडी येथे शिव गोरक्षनाथ नावाने मठ आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात तो बुवाबाजीसाठी प्रसिद्ध आहे. सरोज आनंद गुजर ही महिला भोंदू बाबाच्या संपर्कात आली आणि त्यांच्यातील भेटीगाठी वाढत गेल्या. मागील दोन महिन्यांपासून ती या आश्रमातच राहू लागली. दरम्यान, शनिवारी आनंद गुजर हे पत्नीला भेटण्यासाठी या मठात आले असताना त्यांच्यात वाद झाले. याच वादातून लाकडी दांडक्याने आनंद गुजर यांना बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, यातच त्यांचा मृत्यू झाला. आनंद गुजर यांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना जेरबंद केले आहे.