पुणे - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कुर्हाडीने हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. अनिता तुकाराम कोरे (32) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर तुकाराम गंगाराम कोरे (40) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी तुकाराम कोरे यांची दुसरी पत्नी जगदेवी कोरे (38) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कुऱ्हाडीने वार करत हत्या -
तुकाराम कोरे हा कात्रज परिसरातील मांगडेवाडी भागात दोन पत्नींना घेऊन राहत होता. त्याच्या दोन्ही पत्नी या सख्या बहिणी आहेत. तर गंगाराम कोरे हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. अनिता त्याची पहिली तर जगदेवी त्याची दुसरी पत्नी आहे. ते तिघेही एकत्र राहत होते. तुकाराम हा दुसरी पत्नी अनिता हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. शनिवारी रात्रीदेखील त्यांच्यात याच कारणावरून भांडण झाले. रागाच्या भरात तुकाराम याने पत्नी अनितावर कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान सकाळी उठल्यानंतर तुकारामच्या दुसऱ्या पत्नीला हा प्रकार दिसला. त्यानंतर त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
हेही वाचा - 'बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही'; भाजपचं ममता बॅनर्जींना जोरदार प्रत्युत्तर