पुणे : शहरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. दुसरीकडे गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून सुमारे 577 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. मात्र, शहरातील गुन्हेगारी थांबता थांबत नसल्याचे दिसत आहे. मोफत सिगारेट न दिल्याने हॉटेलचालक गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चेतन बसवराज चितापुरे (वय २२) रा. माझे अली लोहगाव, पुणे याला अटक केली आहे. याप्रकरणी हर्षल गुंजाळ यांनी तक्रार दिली.
हातावर सपासप वार : या संदर्भात अधिक माहिती अशी की, हॉटेल बंद झाल्यानंतर तक्रारदार हॉटेलच्या बाहेर फोनवर बोलत होता. त्यावेळी आरोपीने मोफत सिगारेट मागितली. मात्र, तक्रारदाराने हॉटेल बंद असल्याचे सांगितले. त्यावरुन आरोपीने कोयता बाहेर काढून हॉटेल चालकावर हल्ला केला. यावेळी आरोपीने तक्रारदाराला 'तू मला ओळखत नाहीस. तू मला सिगारेट देत नाहीस, थांब तुला आत्ता दाखवतोच अशी धमकी दिली. तसेच तुझा आज खेळच खल्लास करतो असे म्हणत हॉटेल चालकावर हल्ला केला. आरोपींने तक्रारदाराच्या कान, डोके, मान, डावा आणि उजवा हातावर सपासप वार केले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवार 14 जुलै रोजी पहाटे 4 च्या सुमारास घडली.
बसमध्ये तरुणीचा विनयंभग : पुण्यात दिवसा ढवळ्या तुरुणीचा विनयभंग करण्याची घटना घडली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग झाला आहे. यानंतर बसमधील सहप्रवाशांना मोठा धक्का बसला. पीएमपीच्या प्रवासी तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पौड रस्त्यावर घडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कृत्य एका अल्पवयीन तरुणाने केल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीला अश्लील शिवीगाळ करून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.