बारामती (पुणे) - जेवण न दिल्याच्या कारणावरून आचारी व वेटरला बेदम मारहाण करून हॉटेलची तोडफोड केल्याची घटना बारामती तालुक्यातील सांगवी येथे घडली. याबाबत राहुल बाळासाहेब थोरात (वय 35 वर्षे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
याप्रकरणी स्वप्निल रमेश निकम, सागर संभाजी निंबाळकर, अविनाश कैलास निंबाळकर, अभिजीत भानुदास निर्मळ, अक्षय भरत माने, लखन सावळाराम बरकडे, राज्यात राजेंद्र निंबाळकर, स्वप्निल रमेश निंबाळकर, माऊली बनकर, अक्षय जगताप, सोनू भोईटे, किशोर पांढरे, रणजीत निंबाळकर, संग्राम मोहिते, रोहित मोहिते ( सर्व रा. राजाळे, ता. फलटण जि. सातारा ) यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार (दि. 14 रोजी) पाच ते सहा मद्यपींनी शिरवली गावच्या हद्दीत फलटण रस्त्यावर असणाऱ्या विजय रेस्टॉरंटमध्ये जात हॉटेल मालक वरुण तावरे यांना जेवणाची ऑर्डर दिली. यावेळी जेवणासाठी बंदी असून, फक्त पार्सल चालू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मद्यपींनी येथेच जेवायला देण्याचा तगादा लावत बाचाबाची करत हॉटेल मालक तावरे यांच्याशी झटापट केली. यावेळी गावातील लोकांनी समजूत काढत वाद मिटवला. त्यानंतर मालक तावरे हे आपल्या घरी गेले.
वाद घालणाऱ्या मद्यपींनी आणखी काही तरुणांना एक चारचाकी व चार दुचाकी आणत बेकायदेशीरपणे हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेलची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आचारी व वेटरने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता मद्यपींनी त्यांना तलवार व लाकडी काट्यांनी बेदम मारहाण केली. तसेच आरोपी सागर निंबाळकर याने जीवे मारण्याची धमकी दिली. मोबाईल व हॉटेलच्या काउंटर मधील 10 हजार रुपयेे रोख रक्कम लंपास करत घेऊन पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहे.
हेही वाचा - भोसरी परिसरात वाहनांची तोडफोड करणारे ६ जण जेरबंद