पिंपरी-चिंचवड (पुणे): होम क्वारंटाईनमधून पसार झालेल्या व्यक्तीला महानगरपालिका आणि पोलिसांच्या मदतीने भोसरी येथील रुग्णालयात आयसोलेशन विभागात दाखल केले आहे. ही घटना आज घडली असून, या अगोदर भोसरी रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पोबारा केला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची दमछाक झाली होती. पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. शहरात १२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, काही व्यक्तींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. मात्र, ते घरातून पसार झाल्याचे आज प्रकरण समोर आले आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द, दहावीचे दोन पेपर वेळापत्रकानुसारच - वर्षा गायकवाड
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना आजार फोफावला असून, आत्तापर्यंत १२ जणांना याची बाधा झालेली आहे. यात बहुतांश रुग्ण हे परदेशाहून परतलेले आहेत. त्यामुळे अनेक परदेशातून शहरात दाखल झालेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईनमध्ये १४ दिवस ठेवण्यात येत आहे. याची महानगर पालिकेकडून दिवसातून सकाळ आणि संध्याकाळ अशी पाहणी केली जाते. तो व्यक्ती खरच घरात आहे का? हे पाहिले जाते. परंतु, शुक्रवारी (आज) भोसरी येथील महानगरपालिकेचे पथक पाहणी करण्यासाठी गेले असता, परदेशातून परतलेला व्यक्ती होम क्वारंटाईमध्ये नसल्याचे दिसले. तसेच कुटुंबही घरात नव्हते.
तातडीने संबंधित व्यक्तीचा शोध महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस घेत होते. दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित व्यक्ती सापडला. तेव्हा कुठे महानगर पालिका आणि पोलिसांच्या जीवात जीव आला. त्या व्यक्तीला भोसरीमधील रुग्णालयात असोलेशन विभागात दाखल केले आहे. हे सर्व पाहता होम क्वारंटाईनमधील व्यक्ती या बिनधास्त फिरताना दिसत आहेत.