पुणे - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात लॉकडाऊनमध्ये घरफोड्या करणाऱ्या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक दुचाकी, घरफोडीतील 41 हजारांचे साहित्य आणि रोख रक्कम 5 हजार, असा एकुण 96 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, घरफोडीतील तीन आरोपींचा शोध हिंजवडी पोलीस घेत असून दोन पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
आशिष प्रदीप चराटे (27 रा. चिंचवड) असे घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव असून चंद्रकांत अनंत माने, महावीर प्रवीण लुनावत आणि राजू बंगाली हे अद्याप फरार आहेत. यापैकी, चंद्रकांत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात 18 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
हेही वाचा - विधवा महिलेवर बलात्कार करून बेदम मारहाण करणारे फरार आरोपी जेरबंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील लॉकडाऊनमध्ये जांभे येथे आश्विनी मेडिकल स्टोअर्स हे अज्ञात चार जनांच्या टोळक्याने शटर उचकटून 75 हजारांचे साहित्य चोरले होते. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा अधिक तपास केला असता पोलीस कर्मचारी अतिक शेख यांना चिंचवड चाफेकर चौक येथे गुन्ह्यातील एक आरोपी असल्याचे समोर आले. त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे कसून चौकशी केली असता इतर तीन जणांची नावे समोर आली आहेत.
दरम्यान, आरोपी आशिषने मेडिकलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली असून चोरी केलेल्या साहित्यांपैकी, 41 हजारांचे साहित्य, रोख रक्कम 5 हजार आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 96 हजारांचा ऐवज जप्त करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे.