पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उच्च शिक्षित तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नम्रता गोकुळ वसईकर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे बि-टेक शिक्षण झालेलं असून तिला जावा लँग्वेजचा कोर्स करण्यास 30 हजार रुपये नसल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.
माहिती देताना पोलीस अधिकारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रताला आई आणि वडिलांनी मोठे काबाड कष्ट करून उच्चशिक्षित केले होते. ते मूळ राहणार धुळे जिल्ह्यातील असून मुलाला पुण्यात नोकरी लागल्याने ते पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते. दरम्यान, नम्रता उच्चशिक्षित असल्याने तिला देखील हिंजवडीत चांगली नोकरी लागेल, अशी अपेक्षा कुटुंबातील व्यक्तींना होती. तिच्या वडिलांचे फुटवेअरचे छोटे दुकान असून ते बूट पॉलिश करण्याचे काम करतात. दरम्यान, कम्प्युटर क्षेत्रातील अॅडव्हान्स कोर्स शिकण्यासाठी नम्रताला 30 हजार रुपयांची गरज होती. याबाबत तिने आई वडिलांना सांगितले. मात्र, परिस्थिती बेताची असल्याने हा कोर्स काही दिवसांनी कर, असे नम्रताला सांगण्यात आले होते.
परंतु, तिने सोमवारी सकाळी सातच्या सुमारास वाकड परिसरातील माऊली चौक येथील इमारतीवर जाऊन उडी घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या करताना तिने तोंडावर स्कार्फ बांधला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.