पुणे - पुण्याच्या ग्रामीण भागात आज वादळीवाऱ्यासह पाऊसाच्या सरी सर्वत्र बरसल्या आहेत. गेल्या पाच सहा दिवसांपासून कडाक्याचे उन्ह व उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. आज सकाळपासूनच वातावरणात गारवा होता आणि आज अखेर संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊसाच्या सरी बरसल्या आहेत.
शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. आज झालेल्या पावसामुळे गेली अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र वादळी वाऱ्याने बळीराजा शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अनेक पिके ही जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व पाऊसाने आजपासून जोरदार बॅटिंग केल्याने खरीप हंगामाच्या मशागतीला वेग येणार असून वरूण राजा येत्या काळात असाच मेहरबान राहिल्यास खरीपाच्या पेरणीला बळीराजा लवकरच सुरवात करणार आहे.