पुणे - मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशी शहरात थैमान घातले आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. त्यामध्ये शहरातील अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत भिंत कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष असल्याची माहिती मिळत असून पुढील तपास सुरू आहे. अन्य घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, बुधवारी साधारण पावसाच्या तुलनेने 180 टक्के पाऊस झाला आहे. पुण्याच्या काही भागात केवळ 2 तासांतच 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 6 मृतदेह बाहेर काढले असून मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. संबंधित घटनेची गंभीरता पाहता अरण्येश्वर कॉलनी परिसरात एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. या परिसरात आणखी काही नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित घटनेत २० ते ३० घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे ३ हजारांहून जास्त जणांना फटका बसला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पाणीच-पाणी
संततधार पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला असून कात्रज ते दांडेकर पुलावर देखील पाणी आले. तसेच काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. पद्मावती परिसरात आंबिल ओढ्याची सीमा भिंत कोसळल्याने काही सोसायट्यांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी शिरले. तसेच तावरे कॉलनी, सहकारनगर, लक्ष्मीनगर, दांडेकर पूल वसाहत या भागांमध्ये पाणी घुसले असून जवळपास निम्मे शहर जलमय झाले आहे.
एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू असून कात्रज परिसरातील महामार्गावर दरड कोसळल्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.
बारामतीतून ३ हजार लोक सुरक्षित स्थळी
बारामतीजवळून कऱ्हा नदी वाहते. या नदीमध्ये नाझरे धरणातून 85 हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. या नदीची क्षमता 44 हजार क्युसेकची आहे. जास्त पाणी असल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. बारामतीतून 14 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून आत्तापर्यंत ३ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.