पुणे - शहर आणि परिसरामध्ये गेल्या 24 तासात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे परिसरामध्ये पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची संततधार परिसरामध्ये दिसून आली. गेल्या चोवीस तासात पुणे शहरामध्ये 57.22 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून, या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात एकाच दिवसात तब्बल 1.35 टीएमसी एवढी वाढ झाली आहे.
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, शुक्रवारपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या मध्यम तसेच हलक्या सरी पडल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यापुढेही येत्या 24 तासात परिसरात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे परिसरातील लोणावळा, खंडाळा, पानशेत, वरसगाव, वेल्हा, मावळ, भोर आणि जुन्नर भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.