पुणे - पावसाच्या प्रतीक्षेत असणारा कष्टकरी बळीराजा आता 'पाऊस नको रे बाबा' असे म्हणायला लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. खरीप हंगामाची काढणीला आलेली पीके देखील पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे.
खरीप हंगामाच्या लागवडीपासूनच पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती मात्र, पावसाने दांडी मारली. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या भांडवली खर्चातून शेतकऱ्यांनी पिके कशीबशी उभी केली. मात्र, काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीकही शेतकऱ्यांना गमवावे लागले आहे.
हेही वाचा - अमरावतीत परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल; सोयाबीनला फुटली कोंब, कापूस बोंडे सडण्याचा मार्गावर
शेतात काबाडकष्ट करुन कधी शेतमालाला बाजार भाव मिळत नाही तर कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.