पुणे - जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात गेल्या ४ दिवसांपासून धुक्याची गर्द चादर पसरली आहे. आज सकाळी ९ वाजेपर्यंत पुणे-नाशिक महामार्ग धुक्यात हरवलेला पाहायला मिळाले. धुक्यामुळे नयनरम्य दृश्य दिसत असले तरी परतीच्या पावसातून वाचलेल्या पिकांना या धुक्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्याभरापासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, त्यामधून वाचलेल्या पिकांवर आता धुक्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पहाटेपासूनच गुलाबी थंडी पडत असून या गुलाबी थंडीत पांढरेशुभ्र धुके पडलेले पाहायला मिळत आहे. शहरी भागातील नागरिक या धुक्याचा मनमोहक आनंद घेत आहेत, मात्र, ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत गेला आहे.