पुणे : 'जागतिक दिव्यांग दिना' चे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने वर्ष २०२१- २२ चा 'राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार' वितरण सोहळा नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 3 डिसेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आरोग्य सेवेबद्दल आरोग्यसेविका विमल गव्हाणे यांचा सन्मान (Healthcare worker Vimal Gavane honored) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते (President Draupadi Murmu) करण्यात आला.
सुगम्य भारत' अभियान : राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष २०२१- २२ चे राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यावेळी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिव्यांगांसाठीच्या 'सुगम्य भारत' अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल, महाराष्ट्रातील ४ व्यक्ती, १ संस्था आणि अकोला जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आरोग्य सेवेबद्दल विमल गव्हाणे यांचा सन्मान करण्यात आला आहे.
एकमेव महिला आरोग्य सेविका : डिंग्रजवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या विमल गव्हाणे यांच्या सत्काराने शिरूर - हवेली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. पुणे जिल्ह्यातून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणाऱ्या त्या एकमेव महिला आरोग्य सेविका आहे. गोरगरीब जनतेची विनम्र, निस्वार्थ सेवाभावी वृत्तीने गेली ३७ वर्ष न थकता, अखंड २४ तास प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत सेवा केल्यामुळे, सर्वसामान्य रुग्णांच्या आशीर्वादाने व जनतेच्या प्रेरणेने त्यांना हा पुरस्कार मिळाला. 'मी हा पुरस्कार देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिक, शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब जनतेला अर्पण करीत आहे', असे यावेळी सहाय्यक आरोग्यसेविका विमल गव्हाणे (दौंडकर) यांनी म्हणटले.
योजना अजूनही दिव्यांगांपर्यंत नाही : कोरोना काळात दिव्यांगांसाठी केलेल्या कामगिरी मुळे विमल गव्हाणे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी विमल गव्हाणे यांनी आपल्या 37 वर्षात गोर गरीब जनतेसाठी तसेच दिव्यांगंसाठी केलेल्या कामगिरीबाबत अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच दिव्यांगासाठी जी शासनस्तरावर योजना राबविल्या जात आहे, त्या योजना अजूनही दिव्यांगांपर्यंत पोहचलेल्या नाही. यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत, यावेळी गव्हाणे यांनी व्यक्त केले.