पुणे - पावसाळ्यामध्ये अस्वच्छता आणि गढूळ पाण्यामुळे विविध प्रकारच्या रोगांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता बाळगावी आणि पाणी निर्जंतुकीकरण करूनच वापरावे, असे आवाहन आरोग्य विभाग आणि डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने प्रदूषीत पाण्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोस्पायरासारख्या आजारांचे प्रमाण वाढते. या श्रेणीतील रोगांची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशा रुग्णांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक असलेल्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचार करणे गरजेचे असल्याचे पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. भारत कदम यांनी सांगितले.
पोटाचे विकार टाळण्यासाठी पाण्याच्या टाक्यांचे निर्जंतुकीकरण करणे. रस्त्यावरील आणि शिळे खाद्यपदार्थ टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.