पुणे - शनिवार पेठेतील एका इमारतीवर छापा टाकून पोलिसांनी हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. राज्यात बंदी असलेल्या तंबाखूजन्य व गुटखा विक्रीतून ही रक्कम मिळाली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
एकाचवेळी ४ ठिकाणी छापे
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवार पेठेतील दोन इमारतीवर छापा टाकून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले. या रॅकेटमधील काही व्यक्ती रोख रकमेचा बेकायदेशीर संग्रह करीत होते. ही रोख रक्कम ते बेकायदेशीरपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत होते. हे संपूर्ण रॅकेट गुटख्याच्या बेकायदेशीर पुरवठादाराशी जोडले गेले होते. पोलिसांनी चार ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत नऊ जणांना ताब्यात घेतले.
लोणी काळभोरमधून गुटखा जप्त
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने लोणी काळभोर परिसरातून मोठ्या प्रमाणात केला होता. पोलिसांनी या प्रकरणी नवनाथ काळभोर नामक व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत गुटख्याच्या अवैध व्यापारातून रोख रकमेसाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याचे लक्षात आले होते. हा पैसा हवाला रॅकेटमार्फत पुण्यातून अन्य ठिकाणी नेण्यात येणार होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात पसरली असण्याची शक्यता आहे.