पुणे- केंदीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अजय चड्डा आणि ममता चड्डा या ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जाधव यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती.
जाधवांच्या वकिलांचा रावसाहेब दानवेंवर आरोप-
हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जाधव यांच्या अटकेमागे दानवेंचा हात असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. त्यासाठी दानवेंनी खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डातील कॉंग्रेसचे नगरसेवक मनीष आनंद यांची मदत घेतल्याचेही म्हणणे आहे. एवढेच नाही तर कॉंग्रेसचे नगरसेवक मनीष आनंद यांनी त्यांच्या सहकार्यांसह आपल्याला मारहाण केल्याचा जाधव यांचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय चड्डा (वय ५५)आणि ममता चड्डा (वय ४८, दोघेही रा. बापोडी) काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून औंध येथून संघवी नगरकडे जात होते. त्यावेळी हर्षवर्धन यांनी त्यांच्या मोटारीचा दरवाजा अचानकपणे उघडला. त्यामुळे चड्डा दाम्पत्याने खाली पडल्यामुळे त्यांनी जाधव यांना जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे हर्षवर्धन यांच्यासह त्यांची मैत्रीण इषा झा यांनी चड्डा दाम्पत्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. अजय चड्डा यांच्या हदयाचे ऑपरेशन झालेले असतानाही दोघांनी त्यांच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये लाथा मारल्या. त्याशिवाय ममता यांनाही मारहाण केली. त्यांनी चड्डा दाम्पत्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा मारून जखमी केले. याप्रकरणी हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या मैत्रिणीविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जाधव यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती.