पुणे - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेडच्या सहाय्यक मालकी असणारी हारमन ऑटोमॅटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीचा प्रकल्प चाकण उद्योगनगरीत आज प्रस्थापित करण्यात आला. या कंपनीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मोदी सरकारच्या देशी उद्योगांना चालना देण्यासाठी या प्रकल्पामुळे नक्कीच फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, की मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. मागील ५ वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये सातत्याने व्यवसायाची वाढ व विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहे. तसेच देशामध्ये कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या माध्यमातून पुढील काळात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चाकण उद्योगनगरीमध्ये उभा राहत असलेला हारमन ऑटोमॅटिव्ह इलेक्ट्रॉनिक निर्मितीचा हा प्रकल्प ३५० कोटी रुपये एवढ्या गुंतवणुकीचा आहे. या प्रकल्पाचा विस्तार पुढील काळामध्ये वाढणार असून कंपनीच्या निर्मितीच्या विस्तारातून मेक इन इंडियाच्या स्वप्नाला आधार देणारा हा प्रकल्प आहे. पुणे आणि दिल्ली याठिकाणी आधीपासूनच आरएनटी सेंटरमध्ये ९ हजार पेक्षा जास्त उच्चशिक्षित अभियंता आणि वैज्ञानिक आहेत. हा प्रकल्प जागतिक विकासामध्ये सहभाग घेत असल्याचे हारमन कंपनीचे सीईओ दिनेश पालीवाल यांनी सांगितले.
हारमन कंपनीमध्ये उत्पादित होणारे उत्पादन हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे आहे. तसेच यामध्ये कार सिस्टीम ऑडिओ व्हिज्युअल प्रॉडक्ट ज्यामध्ये इंटरप्राईजेस ऑटोमेशन सॉल्युशन आणि इंटरनेट या गोष्टींना सपोर्ट करणारी सर्व्हिससुद्धा या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामध्ये ऑडिओ ब्रँडसह हारमन ऑडीओ फिल्म म्युझिशियन मनोरंजनासाठी असणार आहे. प्रामुख्याने या कंपनीत उत्पादित होणारे उत्पादने ही ऑटोमोबाईलमधील नामांकित कार कंपन्यांमध्ये दिली जाणार आहेत.