पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाने आपला धुमाकूळ सुरुच ठेवला असून शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले. तर जुन्नर तालुक्यातील ओतूर रोहोकडी परिसरात ढगफुटी झाली. वादळी पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडली. काही ठिकाणी घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिरूर तालुक्यातील चांडोह गावात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. गावातील 50 पेक्षा जास्त विजवाहक पोलही पडले आहेत. पावसाने चांडोह गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मागील पंधरा दिवसांपासून या भागात सतत पडणा-या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आताही ऐन दिवाळीच्या दिवसात पुन्हा एकदा वादळी पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून सरकारने आर्थिक मदत करावी, अशी विनंती शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - पुण्यात 'चंपा साडी सेंटर'; राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरच विभागाचे प्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम केले जाईल. सध्या खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य आहे, अशी माहिती राष्ट्रवादी नेते देवदत्त निकम यांनी दिली.