पुणे - मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असणारी गुटख्याविरोधातली कारवाई आणखी तीव्र होताना दिसत आहे. हडपसर आणि वानवडी परिसरात काही दिवसांपूर्वी गुटख्याच्या कारवाईदरम्यान चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत गुटख्याचे धागेदोरे थेट गुजरातपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या एका टीमने गुजरातमधील सिल्वासा याठिकाणी एका कारखान्यावर छापा मारून तब्बल 15 कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसली, तरी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुणे पोलिसांनी 17 डिसेंबररोजी चंदननगर परिसरात छापेमारी करत सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, नीरज मुकेश सिंगल, प्रवीण मुकुंद वाहुळ यांच्याकडून साडे सात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुटख्याच्या पैशाची देवाण-घेवाण हवाला रॅकेट मार्फत होत असल्याची माहिती उघड झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत तब्बल चार कोटींची रक्कम जप्त केली होती. नऊ जणांना अटकही करण्यात आली होती. पोलिसांनी यानंतर हडपसर आणि वानवडी येथे देखील छापे टाकत चौघांना अटक केली. त्यात 25 लाख रुपयांचा गुटखा पकडला होता. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गुटखा कनेक्शन हे गुजरातमधील वापी व सिल्वासा येथे असल्याचे समजले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या एका पथकाने गुजरातमधील सिल्वासा या ठिकाणी छापेमारी करत तबल 15 कोटी रुपयांचा 'गोवा' गुटखा आणि इतर गुटखा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. ते फरार झाले असून, त्यांची नावे निष्पन्न झाले आहेत, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - राज्यपाल नियुक्त आमदार होऊ न देणारे घटनेचे मारेकरी- संजय राऊत