पुणे - भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नाही तर ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली आहे, असे मत केरळ राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी 'भारतीय एकतेची मूलभूत तत्त्वे' या विषयावर आरिफ मोहम्मद खान बोलत होते.
आरिफ मोहम्मद खान म्हणाले, " भारतीय संस्कृती सर्व प्राणिमात्रांना समान प्रतिष्ठा देते. या संस्कृतीची मुळे वेद व उपनिषदांमध्ये आहेत." नवीन पिढीने हा सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, "भारतीय प्रबोधनात आणि शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचे मौलिक योगदान आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, नामदार गोखले यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुण्याला वारसा आहे आणि तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुढे चालवत आहे. यावेळी डॉ. करमळकर यांनी विद्यापीठाच्या अनेकविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.