पुणे - कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करतांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व बदल स्वीकारुन नागरिकांना सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
हे मान्यवर होते उपस्थित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रमाचा लोकार्पण आणि विविध सोशल मीडिया पेजेस लोकार्पण तसेच स्मार्ट आयएसओ पोलीस ठाणे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिीत होते.
राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढली पाहिजे -
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद साधणारा पोलीस विभाग आहे. पोलिसांकडून उत्कृष्ट सेवेची अपेक्षा करीत असतांना त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची आमची जबाबदारी आहे. नागरिकांना सुरक्षितता वाटावी म्हणून राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढत गुन्हेगारांना धडा शिकवला पाहिजे, असे सांगून राज्य शासन कायम आपल्यासोबत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
या कामासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करावी
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, समाज माध्यम हे जगभरात जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. समाज माध्यमे वापरत असताना काळजी घेतली पाहिजे. नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही याबाबत काळजी घेत समाजात अचूक माहिती प्रसारित केली पाहिजे. या कामासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच्या सूचना देत समाज माध्यमाचा जनहितासाठी पुरेपूर वापर झाला पाहिजे. नागरिकांना उत्तम सेवा देत असतांना चांगले चांगले उपक्रम राबविले जावेत. नागरिक विश्वासाने पोलिसांकडे येत असतात त्यांच्या प्रश्नांची उकल करत त्यांचे समाधान झाले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्या मनात भिती असते त्यांना सुरक्षितता वाटावी अशाप्रकारची सेवा पोलीसांनी दिली पाहिजे. स्कॉटलँड पोलीसानंतर आपल्या पोलीस दलाचे नाव घेतले जाते याचा सार्थ अभिमान आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रमांच्या माध्यमातून चागंली सेवा नागरिकांना मिळावी अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.