पुणे - खेड तालुक्यातील कोयाळी गावात नुकतीच भानोबाची यात्रा पार पडली. ढोल-ताशांचा गजर आणि 'भानोबाच्या नावानं चांगभलं', असा उद्घोष करत हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. देव-दानवांच्या युद्धाचे सादरीकरण, हे या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
भानोबा हे नवनाथ पंथींचे जागरुक देवस्थान मानले जाते. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले भाविक युद्धाचा थरार अनुभवतात. मार्गशिर्ष प्रतिपदेला भानोबा मंदिरासमोरील पटांगणात तस्कर हातात काठ्या घेऊन जमलेले असतात. यावेळी त्यांना एक विडा दिला जातो. तो विडा खाल्ल्यावर देवांनी आपल्यावर वार केल्याच्या भितीने ते अचानक खाली कोसळतात.
हेही वाचा - म्हसवड श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यात्रा उत्साहात संपन्न
अतिशय नाट्यमय वाटणारे हे दृश्य दरवर्षी कोयाळी गावात भाविकांना आकर्षित करते. गावोगावी होणाऱ्या यात्रा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. बऱ्याच गोष्टी अंधश्रद्धेतून होत असल्या तरी लोकांच्या भावना त्याच्यासोबत जोडलेल्या आहेत. भानोबाची यात्रा हे त्याचेच एक उदाहरण आहे.