पुणे - काँग्रेसला उमेदवार मिळतो की नाही, हा माझा विषय नाही. माझे प्रचाराचे अर्धे राउंड पूर्णही झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे काय चालले आहे, त्यांनी काय करावे यामध्ये मला अजिबात रुची नाही, असा टोला पुणे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेसला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैं भी चौकीदार संवाद या कार्यक्रमाचे पुण्यातही लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी बापट यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बापट म्हणाले, विरोधी पक्षावर टीका करण्यापेक्षा मी, माझी यंत्रणा, माझे काम, माझा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेन. माझा कार्यकर्ता घरोघरी पोहोचला की नाही, तो सगळी कामे करतो की नाही, ते मी बघेन. कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक उचलली आहे, त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल.
पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, पुण्यातले वातावरण चांगले आहे. त्यामुळे कोणावरही वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करणार नाही. प्रचाराची पातळी चांगली राहिल याचीही काळजी घेईन आणि पुणेकरांनाही हेच आवडते. आमच्याकडून चांगला प्रचार होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बारामती मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल आणि मी २ एप्रिलला दुपारी १२ वाजता निवडणूक अर्ज भरणार आहोत. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.