बारामती- तालुक्यातील सोरटेवाडी येथे रानगवा दिसल्याने नागरीकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून रानगव्यापासून कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. बारामतीच्या पश्चिम भागात याअगोदर बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र, प्रथमच रानगव्यासारखा प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, रानगावा या प्राण्यांपासून कोणताही धोका नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
रागव्यापासून धोका नाही
सोरटेवाडी येथे रानगवा असल्याचे रविवारी रोजी सायंकाळी काही ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर रानगवा दिसेनासा झाला. पुन्हा सोमवारी (दि.१५) रोजी सकाळी ८ वाजता रानगवा काही ग्रामस्थांच्या नजरेस पडला. दरम्यान सोरटेवाडीचे सरपंच दत्तात्रय शेंडकर यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वनरक्षक योगेश कोकाटे, वनकर्मचारी नंदकुमार गायकवाड, दादा जाधव व पिंटू शेलार यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पायाचे ठसे घेतले आहेत. या ठश्यांची तपासणी केली असता ते रानगव्याच्या पायाचे ठसे असल्याचे स्पष्ट झालेआहे. दरम्यान रानगव्यापासून कोणताही धोका नसल्याचे वनरक्षक योगेश कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- सचिन वाझे प्रकरण : वर्षा बंगल्यावरची बैठक संपली, पाहा काय म्हणाले जयंत पाटील..