पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या कुख्यात गुंडाच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने उस्मानाबाद येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 19 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 38 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 किलो चांदीचे दागिने, असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना गुन्हे शाखा युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत.
चंद्रकांत उर्फ सी.एम अनंत माने (वय 27), राजू शंभू देवनाथ उर्फ राजू बंगाली (वय- 20), राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय 26) आणि अमोल उर्फ भेळ्या अरुण माळी उर्फ घुगे (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखा युनिट चारचे पथक तीन दिवस उस्मानाबाद येथे तळ ठोकून होते. यातील मुख्य आरोपी चंद्रकांत मानेला 2019 पासून दोन वर्षाकरिता तडीपार केलेले आहे. चारही आरोपी हे घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दित यापूर्वी एकूण 76 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, धर्मराज आवटे, पोलीस कर्मचारी प्रविण दळे आदींनी केली आहे.
हेही वाचा - बारामती : ऊसतोडणी कामगारांचा ऊस वाहतूकदारांना करोडो रुपयांचा चुना