पुणे - मागील आठ दिवसांपासून बारामतीमध्ये शेतकऱ्यांच्या शेळ्या व मेंढ्यासह सोनसाखळी, गाड्यांच्या बॅटर्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत बारामती तालुक्यातील चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. अजय अनिल जाधव (वय.२२), सीताराम अंकुश भंडलकर (वय.२७), किरण दामोदर हरिहर (वय.२४), भरत उर्फ तानाजी बोडरे (वय.२८) अशी अटक केलेल्या 4 संशयितांची नावे आहेत. तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोरोना महामारीमुळे उत्पन्न नसल्याने आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशात चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच भर म्हणून मागील आठ दिवसांपासून बारामती तालुक्यातून शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. तसेच सोनसाखळ्या, चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याच्या घटना ही वाढू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रार केल्याने बारामती तालुका पोलिसांकडुन तपास सुरु करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना दिली होती. त्यानुसार लंगुटे यांच्या पथकाने गोपनीय माहितीचा आधार घेत आरोपींना जेरबंद केले. या आरोपींनी बारामती पोलीस ठाणे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या गावातील ८० ते ८५ शेळ्या व बोकड चोरल्याचे कबूल केले.
अशाच प्रकारे, बारामती एमआयडीसीमधून रात्रीच्या वेळी पार्किंग केलेल्या गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याचे तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीनुसार गुन्हेशाखेच्या पथकाने तपास करत ऋतिक महेंद्र शिंदे (वय.२३), रोहन उर्फ कल्या अविदास माने (वय.२४)यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी 5 वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.